Monday, February 21, 2011

मी तो नव्हेच ... मोहन भुजले Mohan Bhujle ... २०११

सेवानिवृत्त होऊन कांहीं वर्षं झाली मला. ह्या वानप्रस्थाश्रमात वेळ कसा घालवता असं कुणी विचारलं तर मी सांगतो, 'भरपूर चित्रपट बघतो'. आमच्या गांवातल्या थियेटरमध्ये सिनिअर सिटीझनांसाठी असलेले शो किंवा नेटफ्लिक्स म्हणत नाहीं मी. माझ्याच आयुष्याचे अनंत चित्रपट म्हणतोय मी. बऱ्याच भूमिका वठवल्या आतांपर्यंत - मुलगा, भाऊ, नातलग, विद्यार्थी, मित्र, नवरा, बाप, सासरा, बॉस, सहकारी, सबॉर्डीनेट, आजोबा, इत्यादि, इत्यादि. वानप्रस्थाश्रमाची किमया हीच की संसारांत राहूनही संसाराकडे अलिप्तपणे बघायला शिकत आहे मी. आतां आयुष्यांत घडत असलेली क्रांती म्हणजे चित्रपटांतील भूमिका गाजवण्याऐवजी प्रेक्षक म्हणून खुर्चींत बसण अधिक आवडू लागलंय मला.

बालपण, तरुणपण, मिडलएज, उतार वय, ह्या सर्व अवस्थांतल्या घटना डोळ्यापुढून जातात. मोठ्या मजेंत आणि सुखांत गेलं आहे माझं आयुष्य. पण सुखी माणसाचा सदरा हा कांही ह्या लेखाचा विषय नाहीं. जीवनातल्या घडामोडींच सिंहावलोकन करतांना प्रामुख्याने आढळून येतं कीं जन्मापासून तो मरणापर्यंत आपली सर्व धडपड फक्त सुखप्राप्तीसाठी असते, मन:शांती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी असते. परस्पर-संबंधांचा, म्हणजे inter-personal relationshipsचा, आपल्या सुखदु:खांत फार मोठा वांटा असतो. माझ्या सुखासाठी इतरांवर मी किती अवलंबून होतो, एव्हढेच नव्हें, तर अजूनही माझं हें सुख किती पराधीन आहे, आणि इतरांवर नियंत्रण करायला मी किती असमर्थ आहे ह्या गोष्टींची खरीखुरी जाणीव मला वानप्रस्थाश्रमातच झाली. जीवनाच्या वाटचालीतले बरेचसे खांचखळगे परस्पर-संबंधांतील गैरसमजुतींतून उपजतात. ह्या गैरसमजुतीच्या कुदळेला एकदां कां मीपणाची धार लागली कीं खांचांचे खंदक होतात आणि खळग्यांच्या दऱ्या. जेव्हढे संबंध निकटचे, तेव्हढीच कारणं क्षुल्लक आणि दऱ्या खोल. आयुष्यांतल्या चित्रपटातले पॉपुलर डायलॉग म्हणजे - 'ये कंबक्त, तुने मुझे पहेछानाच नहीं', किंवा 'तू माझ्याबद्दल किती गैरसमजुत करून घेतलीस रे!' अनेकांनी अनेक वेळा अनेकांना असले डायलॉग टाकले असतील आणि अनेक वेळा अनेकांकडून ऐकलेहि असतील.

पण ही गैरसमजूत म्हणजे नेमकं काय? मला वाटतं एखाद्याबरोबर माझी गैरसमजूत झाली तर मला वाटतं कीं तो मला नीट समजून घेत नाहीं, म्हणजेच माझं म्हणण कसं बरोबर आहे हे त्याला पटत नाहीं; आणि त्याला वाटतं कीं तो कसा शंभर टक्के बरोबर आहे हे माझ्या डोक्यांत जात नाहीं. थोडक्यांत, मी बरोबर आणि दुसरे चूक. आयुष्याच्या मैफिलींत गैरसमजुतीसारखं थैमान घालणारं दुसरं वाद्य नाहीं. किती म्हणून किती गैरसमजुती बघायला मिळतात. हळदीकुंकवाला आमंत्रण मिळाल्याबद्दल होणारा रुसवा, लग्नप्रसंगी होणारे व्याह्यांचे मानापमान, इस्टेटीच्या मिळकतीसाठी होणारी चांगल्या कुटुंबाची वाताहात, ....! कारणे बहुधा क्षुल्लकच पण त्यांचे परिणाम मात्र विध्वंसक असतात. अनेक वर्षे जवळजवळ राहिलेले शेजारी एकमेकांवर बहिष्कार टाकतात, प्रेमळ घरांत वाढलेल्या भावंडांतला ओलावा आटून जातो, नवराबायकोच्या वादावादींत मुलं होरपळून निघतात. प्रत्येकाने असले अनेक प्रसंग बघितले आहेत आणि अनुभवले आहेत. कांही गोळागोळींत त्रयस्थ अथवा हितचिंतक म्हणून कळत-नकळत मीहि ओढला गेलो आहे. अशा प्रसंगी एकचित्ताने मी दोन्हीकडचा दावा ऐकला आहे. अनेक खंदकांचे आणि दरयांचे खोल परीक्षण केले आहे. पण नांव भुजले असूनहि एकदेखील खंदक बुजवू शकलो नाहीं आतांपर्यंत!

ह्या गैरसमजुती होतातच कशा ह्याचे मात्र मला पहिल्यापासून कुतूहल होते. माझा दावा असा कीं गैरसमजुती जरी अनेक प्रकारच्या असल्या तरी त्या सर्वांचे कारण मात्र एकच असते. मला तें मूळच समजून घ्यायचे होते, त्या उगमस्थानाचा शोध घ्यायचा होता. वानप्रस्थाश्रमातील प्रेक्षकाच्या तटस्थ भूमिकेंतून ह्या संशोधनाला बरीच प्रेरणा मिळाली. उतावीळ होता गुपचूप तपास चालू ठेवला, प्रगती होत राहिली, हळूहळू प्रकाशाचा झोत दिसू लागला, आणि अखेर ह्या प्रयत्नांच फळ मिळालं. आयुष्यांतल्या सर्व छोठ्यामोठ्या गैरसमजूतींच्या आईचा, त्या महागैरसमजूतीचा ठावठिकाणा सांपडला. ही महामाया तिची पिल्लं नेहमी आपल्यावर सोडून आयुष्यभर सतावत असते. त्या पिल्लांना तोंड देता देता जीव नकोसा होतो आपला. पण त्या पिटुकल्याना जन्म देणाऱ्या त्यांच्या आईचा मात्र थांगपत्ता नसतो आपल्याला. उलट ह्या महामायेच्या आधारावरच जीवनांतल प्रत्येक पाऊल टाकतो आपण. I'm sleeping with the enemy हे माहीतच नसत आपल्याला. असो. पुराण बरंच लांबल. ह्या महागैरसमजूतीच रहस्य मला जसं समजलं तसं मी तुमच्यापुढे उलगडत आहे.


एके काळीं माझीही सर्वांसारखीच समजूत होती कीं जग एकच आहे. मी त्याच जगांत जन्म घेतला, लहानाचा मोठा झालो, आणि आतां जीवन ढकलत आहे. त्याच एका जगांत माझा परिवार, सखेसोयरे, ओळखीचे अनोळखी लोक वावरत आहेत. परंतु महामायेच्या संशोधनांत मला कळून आलं कीं मी ज्याला जग म्हणतो तें एक काल्पनिक जग आहे. माझ्याच मनाने निर्माण केलेलं माझं स्वत: खाजगी जग आहे तें. त्या जगाचा मी केंद्रबिंदू आहे. माझ्या कल्पना, विचार, अपेक्षा, संकल्प, संवयी, स्मृती ह्यांच्या आधारावर हे जग उभारलं आहे मी. माझे संस्कार, माझ्या दैनंदिन संवेदना मनोविकार ह्या जगाची दिशा ठरवतात आणि त्यावर राज्य करतात. ह्या जगांतल्या बहुतेक घडामोडी माझ्यासाठी अथवा माझ्यामुळे होतात. ह्या माझ्या जगांत गुरुत्वाकर्षणासारखेच आणखी कांही नैसर्गिक नियम आहेत त्या नियमांनुसार ह्या जगाची घडी चाललेली असते. उदाहरणार्थ - माझ्या वर्तणुकीकडे मी नेहमींच प्रेमाने, कित्येक वेळा कौतुकाने पहातो. इतरांच वर्तन अजमावताना मात्र मी कांटेकोरपणे लॉजीक वापरतो. दुसऱ्यांसाठी मी थोडंस कांही केलं तर माझ्या जगांत त्याचा बराच बडेजाव असतो आणि दिवसेंदिवस त्याचे महत्व वाढतच असते. दुसऱ्यांनी माझ्यासाठी कांही केल्याचं महत्त्व मात्र माझ्या जगांत पटकन घटून जातं, कधीं कधीं तर नाहीसच होत. आपोआपच आणि नकळतच होत असतात हे चमत्कार.

हें झालं मी निर्माण केलेलं माझं खाजगी जग. माझं आणि इतरांच दुर्दैव म्हणजे माझ्या ह्या खाजगी जगाला मी इतरहि सर्वांचे जग समजतो. माझं खाजगी जग म्हणजेच सर्वसामान्य, एकमेव विश्व, हीच माझी ठाम समजूत आहे. पण गंमत अशी कीं पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने माझ्याचप्रमाणे स्वत:चे खाजगी जग उभारले आहे आणि त्याचे जग तेंच एकमेव जग असल्याची त्यालाही अगदीं माझ्यासारखीच खात्री आहे. स्वत:च्या खाजगी जगाभोंवती इतरांची अनंत खाजगी जगं असल्याची मात्र कुणालाही जाणीव नाहीं. किंबहुना ज्याला मी जग म्हणतो तें माझं खाजगी जग आहे, हयाचीच कुणाला कल्पना नाहीं. मी महागैरसमजूत म्हणतो ती हीच - प्रत्येकजण स्वत: काल्पनिक, खाजगी जगच सर्वव्यापी विश्व असल्याच्या भ्रमांत असतो आणि इतरांची खाजगी जगं त्याच्या खिजगणतींतहि नसतात. मग आयुष्यांत गैरसमजुतीशिवाय दुसरं होणार तरी काय?

मनाने निर्माण केलेल्या ह्या आपापल्या जगांत नुसता सावळा गोंधळ असतो. आपली सर्व इंद्रिये - कान, नाक, डोळे - ह्या मनाचेच गुलाम असतात. स्वत:च्या जगांत मनाला जे पाह्यचं असतं तेच डोळे पहातात, मनाला जे ऐकायचं असतं तेच कान ऐकतात. सारासार विचार करून निवाडा देणारी बुद्धीदेखील कैक वेळा मनाची गुलाम बनते. आणखी एक गूढ उलगायच म्हणजे - मला वाटतं कीं माझं एकच रूप ह्या जगांत आहे. मला हें माहित नसते कीं माझे असंख्य अवतार इतरांच्या खाजगी जगांत स्वछंदपणे वावरत आहेत. माझ्या ओळखीच्या प्रत्येकाने त्यांच्या जगांत स्वत:च्या कल्पनेनुसार माझा अवतार निर्माण केलेला असतो. बरेच वेगवेगळे असतात हे सर्व अवतार. पण मुख्य मुद्दा म्हणजे माझ्या जगांतल्या माझ्या रूपांत इतरांच्या जगांतल्या माझ्या असंख्य अवतारांत फारसं साम्य नसतं हे सूज्ञास सांगणे नलगे! इतरांचा माझ्याशी व्यवहार होतो तो त्यांच्या जगांतील माझ्या अवताराशी, मीही संधान बांधतो ते माझ्या जगांतील त्यांच्या अवताराबरोबर. परक्यांच राहू दे, नवरादेखील त्याच्या बायकोच्या अवताराशीच संसार करत असतो आणि पत्नीहि साथ देत असते ती तिच्या जगांतील नवऱ्याच्या अवताराला. कोणी जर म्हटलं, 'ती काय तिच्याच जगांत असते', तर मला विचारावसं वाटत, 'आणि लेका, तू कोणाच्या जगांत असतोस?' सुपर बोलच्यादिवशी फॉक्स न्यूजच्या दीडशहाण्या ओरायलीने प्रेसीडंट ओबामाची मुलाखत घेतली. त्याने ओबामाला विचारलं, 'does it disturb you that so many people hate you?' ओबामाने उत्तर दिले, 'People who hate me don't know me. What they hate is a fun-house mirror image of me that's out there..' केव्हढा तत्वज्ञानी माणूस हा. तीन-चार हजार वर्षांपूर्वी भारतांत जन्माला आला असता तर आज महर्षी ओबामा म्हणूनच ओळखला गेला असता.

ह्या महागैरसमजूतीच्या घोळांतून आपण बाहेर कसं पडायचं? दुसऱ्यांच जग ओळखायच कीं स्वत:च्याच जगाचं निरीक्षण करायचं? दुसऱ्यांच जग ओळखण्यासाठी वरवरचे कांही उपाय आहेत. 'मी अमक्यासाठी किती केलं' असले विचार मनांतून पूर्ण काढून टाका, कारण त्याच्या जगांत तुमच्या असल्या विचारांना थारा नाहीं. उलट 'अमक्याने माझ्यासाठी किती बरं केलं' असल्या तऱ्हेचेच विचार नेहमीं मनांत बाळगा. कारण त्याच्या जगांत ह्या महत्कार्याच्या घंटा नेहमीच ठणाणत असतात. आणखी एक बऱ्याच वेळा लागू पडणारा उपाय आहे. तो म्हणजे प्रतिपक्ष भावना - walk in someone else's shoes. एखादी समस्या दुसऱ्यांच्या दृष्टीकोनांतून पाहतां आली कीं तिचे स्वरूपच बदलते. आई आणि मुलाच बघा. आई मुलाच्या जगांत इतकी समरस झालेली असते कीं त्याचे मनोगत तिला सांगता कळते.

पण दुसऱ्यांच जग ओळखणं बरंच अवघड आहे. याच संदर्भांत एक लहानपणाचा प्रसंग आठवतो. मी आठवींत असेन, वर्गातला एक हुशार मित्र एकदम माझ्याशी बोलेनासा झाला. मी कितीही विचारून पण त्याने अबोला सोडला नाहीं. कांही वर्षांपूर्वी मुंबईत त्याची आणि माझी अचानक गांठ पडली. दोघेही एकमेकांना भेटून भलते खूष झालो. खुषी थोडीशी ओसरल्यावर त्याने आठवींत सुरु केलेल्या अबोल्याचा मी स्फोट केला. कपाळावर हात मारून घेतला त्याने. त्याचं डोकं फिरण्याचं कारण म्हणे सहामाही परीक्षेंत मला गणितांत प्रथमच त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले. असल्या नसत्या चुरशीपणामुळं आयुष्यांत स्वत:ला खूपच त्रास झाला असंहि म्हणाला तो. त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे ५० वर्षांनी कां होईना, लहानपणापासून रुतलेल्या ह्या शल्याचा कांटा निघाला. कारण त्याचे बूट घालून मी हजारो मैल जरी चाललो असतो तरी त्याच्या अबोल्याच कोडं कांही मला सुटल नसतं. अलीकडच एक उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्या बऱ्याच वर्षांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने कांही कारण सांगता आमच्याकडे एकदम कट्टी घेतली. आम्हां दोघांपैकी एकाच्या तरी अवताराने तिचा निसंशय मोठ्ठा गुन्हा केला होता. पण बरीच प्रतिपक्ष भावना धारण करूनही आमच्या गुन्ह्याच कोडं सुटलं नाहीं आम्हाला. मोठेपणी होणाऱ्या बहुतेक गैरसमजुती कारणाशिवायच असतात स्पष्टपणाच्या अभावी कधीच सोडवल्या जात नाहींत. प्रत्येकजण अहंतत्वाच्या पांघरुणांत स्वत:ला गुरफटून घेतो आणि जीवनांतला निरागस आनंद गमावून बसतो.

ह्या महामायेने केलेल्या गुंतागुंतीच्या पकडींतून सटकायचा अंतिम उपाय म्हणजे स्वत:चच जग ओळखायला शिकायचं. माझ्या सर्व समस्या माझ्याच जगांत उपजल्या आहेत, तेव्हां माझ्याच जगांत सोडवल्या पाहिजेत. म्हणतांत ना, I'm the problem and I'm the solution. स्वत:च्या जगाला ओळखण्याचा एकच रामबाण उपाय म्हणजे स्वत:च्या जगापासून पूर्ण अलिप्त व्हायचं. स्वत:च्या जगांत आपण जितके गुरफटतो, तितकचं त्या जगाला ओळखण्याचं आपलं सामर्थ्य कमी होतं. दुसऱ्याला अडचणींतून सोडवायला आपण किती उत्तम सल्ला देतो. त्याच्या समस्येपासून आपण अलिप्त असतो म्हणूनच, नव्हें कां? चित्रपटाचा टीकाकार कुठल्याही भूमिकेशी समरस होता शांतपणे खुर्चींत बसून परीक्षण करतो. त्याचप्रमाणे आत्मसमीक्षणासाठी स्वत:च्या चित्रपटांतील 'मी' ह्या भूमिकेपासून स्वत:ला अलग करणं आवश्यक आहे. जगापासून अलिप्त व्हायचं म्हणजे 'मी' 'माझ्या' ह्यांच्या बंधनांतून मुक्त व्हायचं. पण म्हणजे काय? मी, माझा संसार, माझं घर, माझ्या आवडीनिवडी, माझा पोर्टफोलीओ, ह्याव्यतिरिक्त आयुष्यांत काय उरलंय असा प्रश्न पडतो. पण हा प्रश्नच भ्रम आहे आपला.


आपण स्वत:ला काल्पनिक बंधनांत कसे अडकवून ठेवतो ह्याचे उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो. एका गांवांत एक धोबी होता. धुण्यांच्या कपडयांच बोझं गाढवावर टाकून रोज सकाळी तो गांवाबाहेरच्या तलावावर जायचा. जवळच्याच एका झाडाला दोरी बांधून दुसऱ्या टोंकाचा फांस गाढवाच्या गळ्यांत टाकायचा. संध्याकाळी धुउन वाळवलेले कपडे गाढवावर टाकून गांवी परत यायचा. एक दिवस सकाळी तो तलावावर आला पण गाढवाला बांधायची दोरी आणायला विसरल्यामुळे बुचकळ्यांत पडला. शेजारून जाणारा संन्यासी धोब्याला म्हणाला, 'अरे, दोरी नसली तरी काय? गाढवाच्या गळ्यावरून फांस फिरवल्याच सोंग कर आणि जा तलावावर.' धोब्याने तसंच केलं. संध्याकाळी तो परत आला तेव्हां गाढव झाडाभोंवतीच घुटमळत होत. धोब्याने कपडे गाढवावर टाकले आणि निघण्याचा इशारा केला पण गाढव जाग्यावरून जरादेखील हलेना. रस्त्यावरून परत घरी चाललेला संन्यासी धोब्याला म्हणाला, 'सकाळी काल्पनिक दोरी बांधलीस ना त्या गाढवाच्या गळ्यांत, तीच काढ आता'. धोब्याने तसलं नाटक करतांच गाढवाने टांच मारली.

आपणही त्या गाढवासारखंच मी माझेपणाच खोटं बंधन लावून स्वत:ला ह्या जगांत कैदी करून ठेवलं आहे. विरक्तपणे स्वत:च्या जगाकडे बघायला शिकण्यासाठी मीपणाच बंधन झिडकारून द्यायलाच हवं. पण त्याचा अर्थ असा नाहीं कीं सकाळी उठल्यावर स्वत:चे दांत घासायचे नाहींत किंवा रोजचा व्यवसाय बंद करायचा. नित्य व्यावहारिक कर्मे करणं सर्वांनाच भाग आहे. आपण बंधन लावून घेतलं आहे ते मीपणाच्या दोन शृंखलांच - कर्तुत्व आणि भोक्तृत्वाच. हे मीच केलं, हे माझ्यामुळेच झालं, असली कर्तुत्वाची घमेंड डोक्यांतून पूर्ण काढायला हवी. आपल्या आयुष्याच्या घडामोडींत आपण निमित्तमात्र असतो, हा भाव आत्मसात करायला हवा. एकदां कां हा कर्तुत्वाचा जोर कमी व्हायला लागला कीं भोक्तृत्व म्हणजेच आपल्या आसक्ती आणि अपेक्षाहि नाहीश्या होऊ लागतात. जेव्हां मीपणाच्या ह्या शृंखला गळून जातात तेव्हां मोठा बोझा उतरल्यासारख वाटतं. ही काल्पनिक जगं आणि सर्व भेदभाव, गैरसमजुती धुक्यासारख्या विरून जातात. उरतं फक्त ममता, स्नेह आणि प्रेम.


गेली कांहीं वर्षं अध्यात्माची गोडी लागली आहे मला. थोडंबहुत वाचन, बरंचस श्रवण, आणि नियमित सत्संग ह्यांतून जे कांहीं शिकलो त्याच्या आधारावरच हे लिहिलं गेलं. गीता आणि उपनिषदांसारखे ग्रंथ ज्यांनी लिहिले त्यांना ह्या जगाचा अलबेला बरोब्बर समजला होता. म्हणूनच 'ब्रह्म सत्यं, जगन मिथ्या' असा संदेश दिला त्यांनी. ह्या महात्म्यांना चंचल मनाच्या सर्व खुब्या आणि बारकावे कळले होते. सुखाची तीव्र इच्छा असतानाहि हमखास दुखा:कडे चाल करणाऱ्या माणसाचा मूर्खपणा आणि त्याची पंचाईत त्यांना उमगली होती. नेहमी सुखाआड येणाऱ्या आणि गोत्यांत टाकणाऱ्या ह्या मीपणापासून आपली सुटका करायची होती त्यांना. त्यांनी सुचवलेला मार्ग थोडासा लांबलचक असेल, पण आनंदाचं ते बँडएड देत नाहींत, ते बहाल करतात आपल्याला निरंतर आनंदाचा महासागर!

हा लेख मी लिहित असतांनाच झालेली एक गंमत सांगावीशी वाटते. परवां माझ्या मुलीकडे - रैनाकडे - फोनवर बोलत असतांना तिच्या अडीच वर्षांच्या मुलीची लुडबुड कानावर आली. नातीकडे बोलावसं वाटलं. रैनाने फोन स्पीकरवर ठेवला लेकीला म्हटलं, 'Meera, you want to say Hello to Aaba?' नात म्हणाली, 'No, I'm busy now.' मला खूप हंसू आलं. रैना म्हणाली, 'Meera is in her own world.' मी म्हटलं, 'And so is every one else!'

No comments: