निवांत बसुनी घोट चहाचा नुकताच गिळला होता
गात्रांतून एक कळ आली, रक्तदाब घटला होता
नाडी हरवली, चष्म्यावर एक धुकेसे आले
विस्मृत स्मृतींचे डोळ्यासमोर स्पष्ट दर्शन झाले
तुंबलेली मुंबई, ८:१४ लोकल, 'आपली आवड', 'कामगार सभा'
दंगे मोर्चे, शिवाजी मंदिर, फ्लूची साथ, रेशनच्या रांगा
कुलकर्ण्यांचे वडे, शिवसेनेचा झुणका, मामा काण्यांची मिसळ
वह्याना कव्हरं, चोरलेले गृहपाठ, गहूं-तांदळातील भेसळ
माझ्या डोळ्यांसमोर उभा नायगराचा जलविस्तार
जिभेवर मुंबईच्या नळाची चविष्ठ क्लोरीनयुक्त धार
आप्त सर्व आले, देऊन खांदा गेले
खुंटीवर ज्यांच्या नेहमीच पंचे टांगलेले
किती ती घाई जाळून परतण्याची
नळ जाण्याआधी आंघोळ आटोपण्याची
खिडकीच्या गजांतून पाहतो "असीम" मजा
म्हणती, 'मरेपर्यंत जीवंत होता' - किती सूज्ञ ही प्रजा
No comments:
Post a Comment