पाठीला कणा नसल्यामुळे
मी उंटावर चढत नाही
आरामखुर्चीत बसल्याशिवाय
मी शेळ्या हाकत नाही
दूरध्वनीच्या सोयीने
शेळ्या सहज हाती येतात
दहा आकडे फिरवले
की मी सांगतो तिथे जातात
माझ्या आरामखुर्चीभवती आहे
माझी आरामचौखडी (comfort zone)
त्यात सुखरूप राहते
पवित्र भारतीय संस्कृती
कुणी कसे रहावे
कुणी किती खचावे
संस्कृतीची अब्रू राखीत
कुणी आयुष्य खर्चावे
कुणी अपेक्षा करावी
एका रम्य पहाटेची
कुणी उपेक्षा सहावी
रात्रभर आयुष्याची
कुणाची व्यथा
होते माझी कथा
काय उचित, काय अनुचित
याची लागून राहिली द्विधा
मीच न्यायमूर्ती
अन् मीच आहे वकील
माझ्याविना कोण
नैतिकतेचे ओझे वाहील
तेच ओझे सावरीत
आरामखुर्चीत बसतो
दहा आकडे फिरवीत
शेळ्या हाकू लागतो
1 comment:
good one!
Post a Comment