आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं
जेवताना आजोबा लाडात येत
आणि मला आपल्या ताटातली भाकर देत
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत
मी म्हणायचे रागावून, "आजोबा, bad manners, what are you doing?"
आजोबांचं हसून उत्तर, "I am just ढेकरing"
आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल
आजोबा म्हणायचे, "ज्यांना असतं टक्कल, त्यांनाच असते अक्कल"
मी खिजवून म्हणायचो, "yamaka साठी घ्या आता buckle"
मग आजोबा मोठ्याने ओरडून म्हणायचे,
"अरे साल्या चमक्या, मला देतो धमक्या?
यमकांच्या ह्या धंद्यात मी आहे खमक्या"
मी जवळ गेले की मला म्हणत,
"बेटा एक लक्षात ठेव - एकटं एकटं जातां आलं पाहिजे
आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे"
मग मी गोंधळत विचारायचे, "आजोबा म्हणजे हो काय?"
आजोबा मोठ्याने हसून म्हणत,
"म्हणजे काय, म्हणजे काय? म्हणजे नाकात दोन पाय!"
"आजोबा आजोबा, एक गोष्ठ विचारू?
आजोबा आजोबा, तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो?"
"अरे वाह, होत्या म्हणजे काय, होत्याच की
एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती"
"आजोबा, अशी तशी म्हणजे कशी?"
आजोबा सांगणार तेव्हढ्यात खोलीत आजी यायची
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची
आजोबा स्वत:ला आवरायचे, आणि विषय बदलायचे, घसा खाकरत म्हणायचे,
"बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"
आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आरामखुर्चीवर एकटेच बसत
एक टक डोळे लाऊन दूर कुठे बघीत असत
कुठल्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणार्या जगात असत
पाय न वाजविता मी हळूच तिथे जाई, त्यांच्या आरामखुर्चीमागे उभी राही
काय बघीत असतील हे? मी दूर पाही, मला वेगळे दुसरे काही दिसत नसे
तीच झाडं तीच घरं, सगळं काही तसच असे
पाय न वाजवता मी हळूच परत घरात यायची
आणि आजोबांची आरामखुर्ची सावल्यांमधे बुडून जायची
आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं
1 comment:
good one!
Post a Comment